Tuesday, March 28, 2006

ती

शेवटच्या वर्षाची परीक्षा नुकतीच संपली होती. कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूज चालू होते. प्रत्येकाची पुढं काय करायचं याची तयारी सुरू होती. अन अचानक एक दिवस आमच्या ग्रुपमध्ये गोव्याला ट्रिपला जायची टूम निघाली. कारण नंतर कोण कुठल्या वाटेने जाईल माहित नाही. आयुष्यात पुन्हा अशी मजा एकत्रपणे करता येईल की नाही हे ही ठावूक नव्हते. त्यामुळे गोव्याला जायचे आणि मनसोक्त आनंद लुटायचा हे ठरले होते.

ठरल्या प्रमाणे आम्ही सगळे गोव्यात दाखल झालो. वेळेचं कोणतेही बंधन नको असल्याने साईट सीईंग वगैरे काहीच प्लॅन्स नव्हते. कधीही उठायचे, समुद्रात डुंबायचे, बीचवर लोळायचे, खायचे,प्यायचे पुन्हा कंटाळा आला तर पुन्हा समुद्र.. एकदम धमाल चालू होती.

अन एक दिवस एका टपरीवर " ती " दिसली. गोरी गोमटी, वार्‍यावर उडणारे मोकळे भुरे केस, कमनीय बांधा, आणि आवश्यक ती सर्व अंग प्रत्यंग म्हटलं तर झाकलीयत्; म्हटलं तर उघडीयत असा टॉप आणि स्कर्ट अशा पेहरावात ती समोर उभी होती. स्वतःच्या सौष्ठवाची तिला चांगलीच जाण असल्याचे एकंदरीत तिच्या देहबोलीवरून दिसत होते. प्रथम ती आलेल्या गिर्‍हाईकांमधलीच एक आहे असा समज झाला होता पण नंतर लक्षात आले की ती टपरीची मालकीण असावी. प्रत्येकाशी ती हसून, आपलेपणानं वागत होती. हासताना ती खूपच सुंदर दिसत होती. क्षणभर आत कुठेतरी काहीतरी झालं. असं एकटक तिच्याकडे बघतानाच ती आमच्या जवळ आली, सांगितलेली ऑर्डर लिहून घेऊन निघून गेली. ती जवळून जाताना एक मंद सुवास माझ्याजवळ रेंगाळून गेला. माझी नजर तिच्यापाठोपाठच फिरत होती. नंतर माझ्या लक्षात आले की खूप सार्‍ई गिर्‍हाईकं तिच्याकडे असंच रोखून पहात होती. एक दोन गिर्‍हाईकांनी तर तिला नजरेनेच खुणावले. ती त्यांच्याकडे बघून हासली. थोडं विचित्र वाटलं, मन थोडं खट्टू झालं पण नंतर ती नेहमी येणारी मंडळी असतील असं म्हणून मी पुन्हा तिच्याकडे पाहू लागलो.

मग दुसरे दिवशीपण मी त्याच टपरीवर गेलो. खाणं पिणं झालं तरी तिथेच रेंगाळलो. एव्हाना ग्रुपमधल्या बाकीच्यांच्या पण ही गोष्ट लक्षात आली होती. पण त्यांनी चेष्टेवारी ती गोष्ट सोडून दिली. आमचे तसे काहीच खास प्लॅन नसल्यामुळे मी तिथेच रेंगाळलो तरी कुणाला काहीच फरक पडणार नव्हता. मी बारकाईने तिचं निरीक्षण करत तिथेच रेंगाळू लागलो. तिच्या त्या मोहक हालचाली बघितल्या की धडधड वाढायची. तिथेच रेंगाळलो असलो तरी तिने माझी अशी विशेष दखल घेतली नव्हती. थोड्यावेळाने तिथे एक ग्रुप आला. तिने नेहमीप्रमाणेच त्यांचे स्वागत केले. त्या ग्रुपमधील एक दोघे जण तिच्यावर कॉमेंट्स करत होते. मला त्यांचा राग येत होता पण मी काही करू शकत नव्हतो. पण नंतर एकाची मजल चहा देताना तिचा हात धरण्यापर्यंत मजल गेली. अन मी न राहवून आवेशातच तिथे गेलो. तिच्या ते लक्षात आले अन तिने मला हातानेच अडवले. नुसतेच अडवले नाही तर तिच्याबरोबर तिथून घेऊन गेली.
" सायबा राहू द्या हो. कुणा कुणाचा हात धराल? अन कितीजणांशी भांडाल? मला सवयचीच आहे हे. तुम्ही बसा काय देऊ तुम्हाला? "
" अं... नको काही नको. "

मी तिथून बाहेर पडलो. मी तिला मदत करायला गेलो होतो पण ती मला साधे Thanks पण म्हणाली नव्हती. उलट हसून मलाच तिने समजावले. मी जास्तच विचार करतोय असं ग्रुपमधल्या बाकीच्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी मला समजवायचा प्रयत्न केला. त्यादिवसापुरता मी तो विषय डोक्यातून काढून टाकला.

तिसरे दिवशी थोडं आड वेळेलाच मी पुन्हा तिच्या टपरीकडे जाऊ लागलो. टपरीवर गर्दी नसल्याचे लांबूनच दिसत होते. आज टपरी बंद आहे की काय अशी शंका आली. तरी नेटाने पुढे गेलो. टपरीच्या अलिकडेच थोडा पोचलो असतानाच कोणाचा तरी विनवण्या केल्याचा आवाज कानावर आला.
" सायबा असं नका करु. असं नका जाऊ "
" मग काय करु? तो पांगळा त्याच खोलीत पडलाय अन... "
" नाय सायबा तो काही त्रास देणार नाही. मी गोधडी टाकीन त्याच्या अंगावर. तोंड बांधून ठेवीन त्याचं. काही करणार नाही तो, काही बोलणार नाही तो.. ये सायबा ये.. चार पैसे मिळाले तर त्याला मोठ्या डॉक्टरला दाखवता येईल... "
" हुड... "
मी तिचा आवाज ओळखला होता. अन ते थरारक दृश्य मला दिसले. एक रांगडा उंच मनुष्य जात होता अन ती त्याच्या पायाला धरुन त्याची विनवणी करत होती. तिच्या विनवण्यांकडे लक्ष न देता तो तसाच पुढे चालला होता. तिने त्याच्या पायाला धरले असल्याने ती थोडीशी फरफटली. तरी तो निघून गेला. मी पण परत जायच्या विचारात असतानाच तिचे माझ्याकडे लक्ष गेले.
" सायबा. ये. माझ्याकडेच आला होता ना? "
" ..... "
" ये ना. जास्त पैसे नाही घेणार. "
" नाही मी त्यातला नाहिये. पण हे घे. " मी खिशातून थोडे पैसे काढून तिच्या समोर धरले.
" सायबा भिक नकोय मला. ते पैसे ठेव तुझ्याकडेच. "

मी जड मनाने तिथून गेलो. ती " तसली " असेल अशी थोडीसुद्धा कल्पना नव्हती. पांगळ्या भावाच्या इलाजाकरता ती हा उद्योग करत होती. त्यादिवशी स्वतःच्या संवेदना कुस्करुन भावाचा इलाज करण्याचा तिचा " स्वाभिमान " मला माझ्या " नैतिकते " पेक्षा मोठा वाटला...

2 comments:

Anonymous said...

छान लिहिलंय. पण तुमच्याच "मन्या" इतकं छान नाही जमलंय..

मिलिंद छत्रे said...

abhyaa : chhan lihile aahes re...
ekdam shahaare aaNanaare..
satya ghatanaa ki kaalpanik?

maage pan tulaaa sangitaley tu chhan lihitos ajun lihi aani lihit raha