Friday, June 30, 2006

मेघ

दरवर्षी पाऊस येतो
चिंब चिंब बरसून जातो
दरवर्षी मी मेघदूतातल्या
माझ्या मेघाची वाट बघतो... अन..

इवलासा एक काळा ढग
माझ्यासमोर उभा राहतो
मऊशीर हातानी अलगद
मला कवेत घेऊ पाहतो॥ मग॥

पावसासंगे गोफ विणत
मी ही दूर फिरुन येतो
नदी नाले झाडाझुडपांत
ओल्या आठवणी रित्या करतो

सरींच्या तालावर नाचतो
रानी-वनी खूप बागडतो
चिंब होऊन दमल्यावर
हळूच घरी परत येतो॥ नंतर..

सताड उघड्या खिडकींतून
उनाड पाऊस आंत येतो
शांत बसल्या माझ्याशी
अवखळ लगट करु पाहतो

कितीही दूर लोटलं तरी
पुन्हा पुन्हा जवळ येतो
हसून मग मी ही त्याला
माझ्या डोळ्यांत साठवून घेतो.....

दरवर्षीच्या पावसाळ्यात
हे असंच काहीसं होतं
दरवर्षी आतुरलेलं मन
माझ्या मेघाची वाट बघतं.......