Monday, April 03, 2006

अनुभूती

मी अस्तिक आहे की नास्तिक मलाही नीटसं माहित नाही. मुंज झाल्यावर १० वर्षे नेमाने संध्या पाठ केले पण नंतर अचानक बंदही केले. इतकंच काय गळ्यातून जानवं पण गायब झालं. अजूनही मी नेमाने देवळात जातो पण घरी देवपूजा करत नाही. या सर्व गोष्टी अशाच करायच्या म्हणून ठरवून करत नाही मी. जे मनाला पटते, जिथे समाधान मिळते त्या गोष्टी मी करतो.

माझे बाबा मात्र खूपच धार्मिक होते. पण त्यांनी कुठल्याही गोष्टीची माझ्यावर सक्ती केली नाही. नित्य नेमाने देवपूजेपासून ते गौरी गणपती, नवरात्रा पर्यंत सर्व गोष्टी त्यांनी मनोभावे घराण्याच्या परंपरेनुसार सोवळे ओवळे पाळत केल्या. घरी दर वर्षी सत्यनारायणाची पूजा आणि गणपती अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तने पण असतात. त्यापैकी सहस्त्रावर्तने अस्मादिकांचा जन्म झाल्यावर कुणीतरी बाबांना माझ्यासाठी करावयास सांगितली. आणि एकाही वर्षाचा खंड न पडता त्यांनी ती केली. त्यांच्या मागे मला हे सर्व कितपत जमेल याबद्दल मी थोडा साशंकच होतो पण मलाही ते विनासायास जमून जातय.

मागच्याच आठवड्यात सालाबादप्रमाणे सहस्त्रावर्तने झाली. बाबांच्यानंतर मी आवर्तने करण्याचे यंदाचे हे तिसरे वर्ष. आमचे गुरुजी त्यांच्याकडे वेद शिकणार्‍या दह मुलांना घेऊन दरवर्षी येतात आणि अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम होतो. एक हजारावं आवर्तन उपस्थित सर्वजण उच्चारवात म्हणतात. गेली तीनही वर्षे त्या शेवटच्या आवर्तनात मला माझ्या बाबांचा आवाज ऐकल्याचा भास होतो. याला भास म्हणावे की अनुभूती माहित नाही पण तोच आवाज, तसेच स्पष्ट उच्चार.. जणू ते तिथे माझ्या शेजारीच असावेत..

मी म्हटलं तसं की आठवणींच्या रुपात ते कायमच माझ्या बरोबर असतात पण ते असे कधी कधी भेटून जातात...