Saturday, December 31, 2005

श्रीगणेशा!!

देवनागरीत लिहिता येईल असं समजल्यामुळे इथे आलो. उत्साहाने रजिस्टर तर झालो पण इथे काय लिहावं हा यक्षप्रश्न पहिल्यांदा डोळ्यासमोर आला. आणि अचानक गेल्या पावसाळ्यात अशाच काही जुन्या आठवणी कुठेतरी खरडून ठेवल्याचे आठवले.. तेंव्हा मंडळी जाऊयात थोडसं फ्लॅशबॅकमध्ये......
*****
बाहेर आभाळ दाटून आलं होतं.. कुठल्याही क्षणी पाऊस पडेल असं वाटत असतानाच त्याचं बरसणं चालू झालं.. पावसाचं ते तांडव बघत असताना मन मात्र भूतकाळात चाललं होतं..

डोंगरांच्या कुशीत वसलेलं सातारा माझं गांव.. घर अगदी डोंगराच्या पायथ्याशी होतं आमचं..घराभोवती छोटीशी बाग.. मातीचं अंगण.. बाबांना बागकामाची खूप आवड होती त्यामुळे खूप वेगवेगळ्याप्रकारची झाडं बागेत होती.. बाग कायम नीटनेटकी असायची..पावसाळ्याच्या दिवसांत डोंगर उतारावरून येणारं पाणी अंगणात साचायचं.. पाणी साचून साचून मग संपूर्ण अंगणभर मऊ हिरव्यागार शेवाळ्याचा थर साठायचा.. निसरडं व्हायचं पण तरीही त्यावरुन चालताना पावलांना होणारा ओला मऊ स्पर्श छान वाटायचा.. अगदी लहानपणी एक समजूत होती ( शाळेत पाऊस कसा पडतो हे शिकवण्यापूर्वी ) की पाऊस समोरच्या डोंगराच्या पाठीमागून येतो..म्हणून मग आकाशात ढग जमा झाले की पहिल्यांदा पावसात आपल्याला भिजायला मिळावं म्हणून आमची वानरसेना डोंगरावर धूम ठोकायची.. ( आता आठवलं तरी हसू येतं ) .. बहुतेकवेळा डोंगरावर पोचण्यापूर्वीच पावसाला सुरुवात होउन सर्व सेना चिंब भिजायची.. घराजवळून डोंगराला टेकलेले जे ढग दिसायचे ते तिथे गेल्यावर कुठे गायब व्हायचे याचं आश्चर्य वाटायचं.. डोंगरावरुन एका बाजूला आमची कॉलनी दिसायची आणि एका बाजूला गांव दिसायचे.. मग ढगांचं आश्चर्य ओसरुन जायचं आन ओळखीच्याच गोष्टी डोंगरावरुन पुन्हा एकदा ओळखण्याचा खेळ व्हायचा.. पावसात चिंब भिजलेलो असलो तरी डोंगरातून वाहणार्‍या पाण्याच्या ओहळांमध्ये पुन्हा भिजायचो.. मुद्दाम निसरड्या वाटा शोधून तिथे घसरगुंडी खेळायला खूप मजा यायची.. अशा वाटा शोधून काढण्याची जणू एकमेकांत स्पर्धाच असायची.. आपण शोधून काढलेली वाट जणू आपल्याच मालकीची वाटायची.. चिखलात लोळून, मनसोक्त खेळून झाल्यावर आम्ही घरी परतायचो.. साधारण पाचवी, सहावी पर्यंत दरवर्षी हाच आमचा नित्यक्रम बनून गेला होता.. तसं बाराही महिने आम्ही डोंगरावर खेळयला जायचो पण पावसाळ्यातला डोंगर त्या न कळण्याच्या वयातही वेगळा भासायचा...

थोडं मोठं झाल्यावरही पावसात भिजण्यावरुन आई बाबांचा ओरडा खाल्लेला तितकासा आठवत नाही पण ओरडा बसायचा तो घरासमोर अंगणात साचलेल्या पाण्यात खेळताना.. कारण थोड्यावेळात पाणी ओसरायचे आणि मग नुसतंच शेवाळं आणि चिखल असायचा.. आम्ही चिखलातच विटी - दांडू किंवा क्रिकेट, अबाधुबी, चिप्परपाणी वगैरे खेळायचो..मनसोक्त खेळून झालं की आमची रवानगी बागेतल्या हौदावर व्हायची.. तिथे हातपाय धुवून मग घरात जायचे.. पण चिखलात इतकं माखलेलं असायचो की थोडासा तरी चिखल घरात जायचाच.. मग मात्र बाबांचा रागाचा पारा एकदम चढायचा.. खूप राग यायचा तेंव्हा बाबांचा.. पण तो व्यक्त करण्याची हिंमत कधीच नव्हती.. मग आई आंघोळीला गरम पाणी द्यायची.. किती मस्त वाटायचं...

नंतर जेवताना कधी कधी बाबांच्या हातची गरम भाकरी, कुळीथाचं पिठलं, जोडीला खास काटदर्‍यांची लसूण चटणी.. व्वा.. मजा यायची.. तेंव्हा बाबांवरचा राग थोडा कमी व्हायचा.. घरी टि. व्ही. नसल्यामुळे इतर गोष्टींत वेळ न घालवता थोडा अभ्यास ( ? ) करुन झोपी जायचो.. सतत पाण्यात खेळल्यामुळे बर्‍याचदा पाय दुखायचे.. त्यावेळी न सांगता तेल, अमृतांजन लावून पाय चेपणार्‍या बाबांची मूर्ती मला आजही स्पष्ट आठवते.. तो स्पर्श न बोलताही खूप काही सांगून जायचा.. त्यावेळी मी त्यांच्यावर परत कधी रागवायचे नाही असा पक्का निश्चय करु झोपी जायचो पण तो निश्चय दुसरे दिवशी सकाळी उठेपर्यंतच टिकायचा...

मुळात बाबांचा स्वभाव थोडा अबोलच.. निटनेटकेपणा, शिस्त हे त्यांचे अंगभूत गुण होते.. त्यामुळे मग एखादी गोष्ट थोडी जरी नीट नाही झाली नाही की त्यांना राग येत असे.. राग आला तरी ते जास्त ओरडत नसत तर उलट जास्तच अबोल होत. गौरवर्ण असल्यामुळे अशावेळी त्यांच्या चेहर्‍यावर आलेली लालसर छटा स्पष्ट दिसायची.. एखाद दुसरा अपवाद वगळता त्यांनी मला कधी मारल्याचे स्मरत नाही.. नियमीतपणा त्यांच्या रक्तातच भिनलेला होता.. दररोज उठल्यापासून त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा.. शेवटपर्यंत त्यात कधी बदल झालेला मला स्मरत नाही.. देवधर्म, सोवळे ओवळे ते कटाक्षाने पाळत.. पण त्याचे त्यांनी कधीच अवडंबर माजवले नाही ना आमच्यावर तशी कुठलीही सक्ती केली नाही..

एक नक्की की बाबांच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे आम्हा भावंडांना खूपशा चांगल्या आणि नेटक्या सवयी आपोआपच लागल्या.. लहानपणी त्यातल्या काही गोष्टी जाचक वाटायच्या पण आज त्याचे फायदे जाणवतात.. त्यांनी आमचे फाजिल लाड कधीच केले नाहीत पण आमचे सुलभ बालहट्टही कधी पुरवले नाहीत असंही नाही.. स्वतःचे खूप शिक्षण झाले नसले तरी आम्हाला पुरेसं शिकवलं.. आम्ही काय शिकावं, काय करावं हे निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले.. सर्वात महत्वाचे म्हणजे उत्तम संस्कारांची आम्हाला आयुष्यभर पुरेल एवढी शिदोरी दिली.. आज माझ्या हातून जर काही चांगले घडत असेल तर ती माझ्या आई - बाबांची पुण्याई. जर काही वाईट घडत असेल तर तो सर्वस्वी माझा दोष......

असो....

आज पावसामुळे या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.. बाबा आजही आठवणींच्या रुपात कायम माझ्या बरोबर असतात.. फक्त कधी कधी ते असे भेटून जातात जसे आज पावसाच्या रुपात भेटून गेले............