Wednesday, January 11, 2006

सांजवेळ

सांजवेळ.. दिवस आणि रात्र यांच्या सीमारेषेवरचा हा समय.. खरंतर प्रत्येक संध्याकाळ हा एक वेगळाच अनुभव असतो.. बदलत्या ऋतूप्रमाणे या सांजवेळांनाही स्वतंत्र व्यक्तीत्व असते.. उन्हाळ्यात ती संध्यामधुरा असते, पावसाळ्यात ती काजळमाया असते तर हिवाळ्यात ती गुलाबी थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकरीची शाल पांघरुन आल्यासारखी भासते.

उन्हं कलंडून सावल्या लांबल्या की तिची चाहूल लागते.. सलज्ज तरूणी सारखी ती क्षितीज आरक्त करून हलकेच येते.. प्रियकराला भेटण्याच्या ओढीने येणार्‍या खट्याळ प्रेयसीचा आवेग तिच्या येण्यात भासतो.. दीनकराच्या अस्ताबरोबरच तिचे अस्तीत्व अधिकच गहिरे बनते.. सोबतीला चंद्र, चांदण्या आल्यावर तर ती एखाद्या माहेरवाशीणी सारखी अल्लडपणे बागडते.. पण...... तिचा हा अवखळपणा बघायलाच निशाराणी येते अन तिच्या चाहूलीनेच ही षोडषवर्शी भासणारी संध्याकाळ बावरते... कोमेजून जाते.. निशाराणीच्या आगमनाने तिचे अस्तीत्वच मिटते.. दररोज एक अनामिक हुरहुर लाऊन सांजवेळ निघून जाते.....

आपल्या आयुष्यातही अनेक घटना, अनेक व्यक्ती अशा सांजवेळेसारख्याच येऊन जातात.. त्यांची सोबत कधीच संपू नये असं वाटतं पण त्याही तशीच अनामिक हुरहुर लाऊन जातात..पुन्हा नव्याने भेटण्यासाठी..........

तम उमलू लागतां
सूर्य चुंबतो सागर
चांद भेटीला आतुर
सांज कोवळी अधीर

होते क्षितीज आरक्त
जेंव्हा लांबते सावली
जन्मे कुशीत उन्हाच्या
सांज सानुली तान्हुली

पंख घरट्यात येती
रिते भासते आभाळ
चारी दिशांना वेढते
सांज मोहक वेल्हाळ

मंद चांदण्या फुलती
गोड गाणे बहरते
होतां चाहूल रातीची
सांज मुकी बावरते

रात्र उतरतां दारी
विझे सागर निळाई
किती खेळही निराळा
सांज निसटूनी जाई

Tuesday, January 03, 2006

दिंडी

मुक्तीची आस मनी घेऊन
पाखरु उडाले सोडून कुडी
गांवकुसाची वेस ओलांडून
चालली संवेदनांची दिंडी

रामनामाचा गजर सभोवती
गर्द आभाळ चांदण्या विरक्त
एकमेका छेदत उंच लपेटती
आकाशी केशरी ज्वाळा आरक्त

प्रकाश अंधाराच्या वेशीतून
नश्वराचा ईश्वरी प्रवास
आपल्याच रंगात तल्लीन
बधीर जाणीवा मन उदास

वाट पावलात अडखळली
जेंव्हा वेळ झाली परतीची
पाप - पुण्य वजा करता
राख उरली आयुष्याची....