Friday, May 19, 2006

माझी छकुली

" इज इट अभि? "
" येस. स्पिकिंग. "
" अभि कॉल फॉर यू "
" प्लीज ट्रान्स्फर इट. थॅंक्यू. "
......
" हॅलो, अरे रुपाली बोलतीय. "
" हॉस्पिटलमध्ये निघालायत का? "
" अरे! अभिनंदन!! आपण दोघे आई - बाबा झालो. तुझाच अंदाज बरोबर ठरला. मुलगी झाली. पंधरा मिनिटे झाली. नॉर्मल झाले. सात पौंड आहे वजन. गोड आहे रे एकदम!! तू कधी निघतोयस? "
" कधी काय लगेच निघतोय!! "
......

आज या रोमांचकारी क्षणाला एक वर्ष पूर्ण झालं. मला उगाच टेन्शन नको म्हणून सौभाग्यवतींनी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायच्या आधी मला कळवलेच नव्हते. त्यामुळे त्या अद्भुत अनुभवाला मी मुकलो. अर्थात आम्ही आई बाबा होणार हे समजल्यापासून ते आजतागायत अनेक रोमांचकारी आणि सुखद अनुभव आम्ही जगलोय. प्रत्येक " पहिल्या " गोष्टीची मजा काही निराळीच असते.

त्या चिमुकल्या जीवाचं पहिलं " दर्शन " आम्हाला पहिल्या सोनोग्राफीच्यावेळी झाले. वीत-दीड वीतीचा तो जीव हालचाल करताना बघून काय वाटलं ते खरंच शब्दात मांडणे अवघड आहे. आम्ही दोघे तो जीव पोटात असल्यापासूनच त्याच्याशी खूप गप्पा मारायचो. आणि तो जीवही त्याच्या पद्धतीने त्याला प्रतिसाद द्यायचा. त्याची ती होणारी हालचाल, आतून मारलेल्या ढुश्या म्हटलं तर थोडसं त्रासदायक वाटणारा पण तरीही हवा हवासा वाटणारा तो अनुभव ही प्रत्येक माताच जाणे. ते सुख पुरुषाच्या नशिबी नाहीच. तर दिसामाजी योग्य ती प्रगती करत तो जीव रुढार्थाने या जगात प्रवेश करण्याइतपत पक्व झाला. इथेच त्या जीवाने खट्याळपणाची पहिली चूणूक दाखवली. डॉक्टरीण बाईंनी अंदाज वर्तवला की साधारणतः अपेक्षीत दिवसाच्या अंदाजे पंधरा दिवस आधीच आमचं बाळ या जगात प्रवेश करेल. आम्ही सर्वजण त्या नव्या जीवाच्या, आमच्या बाळाच्या स्वागताला तयारीत होतो. पण अखेर " ती " मात्र अगदी ठरल्या दिवशीच या जगात प्रवेशती झाली. " आतुरता " या शब्दाचा पुरेपूर अर्थ आम्हाला त्या दिवसांत समजला.

गेले वर्षभर सईच्या बाललीला आम्ही दोघे समाधानाने अनुभवतोय. खरंच प्रत्येक मूल हे स्वतःच्या आई-बापाला त्यांचं सरलेलं बालपण जगायची पुन्हा एक संधी देत असतं फक्त पालकांचा दृष्टिकोन तसा असायला हवा. तिच्या हुंकार देण्यापासून ते आताच्या खास तिच्या भाषेतल्या बडबडीपर्यंत, तिच्या कुशीवर वळण्यापासून ते आताच्या दुडुदुडू चालण्यापर्यंत सर्व क्षण मी पुन्हा एकदा जगलो. आता हे सर्व क्षण कॅमेरात चित्रबद्ध आहेतच पण तरी ते अक्षरशः पुन्हा जगण्याचा जो अनुभव आहे तो निराळाच. अर्थात त्याचबरोबर आपण " बाप " झालो आहोत याचंही भान ठेवावं लागतं. गेले वर्षभर " पालक " म्हणून बर्‍याच गोष्टी आम्ही शिकल्या, अनुभवल्या अन पुढेही शिकत राहूच.

आज सई वर्षाची झाली हे खरंच वाटत नाहिये. खूप लवकर काळ सरकल्याचा भास होतो आहे. अर्थात सर्वच चांगल्या गोष्टी घडताना असंच वाटत राहतं. आज तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा, आशिर्वाद यांनी ती उत्तरोत्तर मोठी होत जाईल. पण आज तिचा " बाबा " म्हणून तिला आशिर्वाद देताना देवाजवळ एवढीच प्रार्थना करतो की तिला चांगलं माणूस म्हणून घडवण्याचे बळ माझ्या पंखात सदा राहो...

4 comments:

Anonymous said...

मी तुमचे लिखाण नेहमी वाचतो. लिहित रहा. तुमच्या छकुलीला माझ्या खूप शुभेच्छा!!

चंद्रकांत

Anonymous said...

अभ्या, सई वर्षाची झाली??? बापरे!! आता घरी आलेच पाहिजे तुझ्या तिला भेटायला!!

उज्ज्वल

Anonymous said...

तुमच्या छकुलीला माझ्या अनेकानेक शुभेच्छा!!
असेच लिहीत रहा !

Vaishali Hinge said...

tujhyaa Chakulalilaa khup saaryaa shbhechchaa... !!!!!
aaNi asaach Chaanlihit rahaa..