Tuesday, January 03, 2006

दिंडी

मुक्तीची आस मनी घेऊन
पाखरु उडाले सोडून कुडी
गांवकुसाची वेस ओलांडून
चालली संवेदनांची दिंडी

रामनामाचा गजर सभोवती
गर्द आभाळ चांदण्या विरक्त
एकमेका छेदत उंच लपेटती
आकाशी केशरी ज्वाळा आरक्त

प्रकाश अंधाराच्या वेशीतून
नश्वराचा ईश्वरी प्रवास
आपल्याच रंगात तल्लीन
बधीर जाणीवा मन उदास

वाट पावलात अडखळली
जेंव्हा वेळ झाली परतीची
पाप - पुण्य वजा करता
राख उरली आयुष्याची....

2 comments:

शैलेश श. खांडेकर said...

ही खूपच छान कविता आहे. अतिशय गंभीर विषय उत्कृष्टरित्या मांडलेला आहे.

-शैलेश

यशोधरा said...

किती सुरेख लिहिलय... मायबोलीवर जितके सुरेख फोटो टाकतोस, तितकच सुरेख लिहितोस देखील! इथल्याही एकाच फोटोला कमेंट टाकली पण सगळेच फोटो सुरेख आहेत, अन लिखाणही अतिशय दर्जेदार!!

अगदी योगायोगाने तुझा ब्लॉग सापडला. :)