Sunday, May 02, 2010

Friday, May 15, 2009

दिवेआगर

चांदणी चौक सोडून पिरंगुट, मुळशी मार्गे ताम्हिणी घाटाचा रस्ता पकडला आणि थोडं हायसं झालं. कारण सुट्टीला म्हणून कुठेतरी भटकायला शेवटचे कधी गेलो होतो? हा प्रश्न पडावा इतकी वर्ष उलटली होती. आता १ मे च्या सुट्टीला जोडून वीकेंड आला असल्याने कुठेतरी जाऊया असं ठरवलं होतं. पण ठरवलं तरीसुद्धा गाडी "कुठंतरी" च्या पुढेच सरकत नव्हती. कारण हे ठरत असतानाच १ तारखेला जेमतेम ५-६ दिवस उरले होते आणि त्यामुळेच आता सगळी कडेच गर्दी असेल, आपल्याला बुकींग मिळेल का वगैरे प्रश्न डोक्यात फेर धरुन नाचत होते. सरते शेवटी "दिवेआगर" ला जायचं हे फायनल झालं.

मग आंतरजाल, मित्र-मैत्रिणी यांच्या मार्फत तिथे राहण्यासाठी संपर्क घेतले. पण हाय रे नशिब! आधी जे प्रश्न डोक्यात फेर धरुन नाचत होते ते आता नकारघंटा वाजवत कानावर आदळत होते. सर्व आटापिटा करुनही कुठेच रहायची सोय होत नव्हती. मग "दिवेआगर"चा नाद सोडून तमाम कोंकण किनारा आंतरजालावर धुंडाळायला सुरुवात केली. पण "दिवेआगर" पासून सुरू झालेली नकारघंटा काही थांबायचे नाव घेत नव्हती. हळूहळू मनाची खात्री पटू लागली होती की "कुठेतरी" जायच्या बेतावर आता पाणी फिरणार किंवा मग पर्याय म्हणून अगदीच "कुठेतरी" जायला लागणार. पण बहुदा नशिबाला आमची दया आली आणि एका परिचितांकडून "दिवेआगरच्या" त्यांच्या एका परिचितांचा संपर्क मिळाला. त्यांच्याकडून आधी नकारघंटा ऐकली होती पण आता आमच्या परिचितांचा संदर्भ दिल्याने त्यांना आमच्यासाठी काहीतरी सोय करणे आवश्यक बनले होते. त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही या पण माझ्या इथे नाही पण अजून एका नवीन ठिकाणी तुमची सोय करतो. एवढे सगळे होईतो १ तारीख दोन दिवसांवर येऊन ठेपली होती. मग ऑफिसमध्ये इकडच्या - तिकडच्या सर्व सायबांना १ तारीख "सार्वजनिक सुट्टी" असल्याची वारंवार आठवण करून देत कोणतेही अचानक काम येणार नाही याची खबरदारी घेतली.

सरते शेवटी तो ऐतिहासीक "महाराष्ट्र दिन" उगवला. आणि आम्ही "दिवेआगर" ला मार्गस्थ झालो. पुण्याहून दिवेआगरला जायला जवळचा रस्ता म्हणजे ताम्हिणी घाटातला. घाट संपला की मुंबई-गोवा महामार्गावर माणगांव लागते. तिथून म्हसाळ्यापर्यंत गेले की श्रीवर्धन चा रस्ता पकडायचा की म्हणता म्हणता आपण दिवेआगर मध्ये पोचतो.

दिवेआगर गांव लहान आहे त्यामुळे तिथे सहस्त्रबुद्ध्यांचा "सृष्टी व्हिला" सापडायला काहीच अडचण आली नाही. त्यांनी आमची सोय दुसर्‍या एका ठिकाणी केली होती म्हणून मग त्यांचा एक माणूस बरोबर घेऊन आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. "शिवाजी चौका" पासून अगदी ५ मिनिट अंतरावर आमचे राहण्याचे ठिकाण होते. तिथे पोचलो तर काही मंडळी तिथे अगोदरच दिसली आणि हा "डबल" बुकींगचा प्रकार आहे की काय अशी शंका मनात आली. तितक्यात एक प्रसन्न चेहर्‍याचे काका पुढे आले. आमच्या वाटाड्याने त्यांचा "हे नलावडे काका" म्हणून परिचय करुन दिला. काकंनी हासून आमचे स्वागत केले आणि सांगितले की या खोल्या तुमच्यासाठीच ठेवल्या आहेत पण काल मध्यरात्री नंतर ही दिसतायत ती मंडळी मुंबईवरुन आली आणि त्यांची कुठेच सोय होत नव्हती म्हणून केवळ रात्री पुरती मी त्यांची व्यवस्था इथे केली. अगदी ५ मिनीटांतच ती मंडळी तिथून रवाना झाली. आणि आम्ही आमच्या खोल्यांचा ताबा घेतला. विशेष म्हणजे खोल्या एकदम टापटीप दिसत होत्या. आमच्या आधीची मंडळी आमच्या समोरच बाहेर पडली होती पण तेवढ्या कमी कालावधीत नलावडे काका आणि काकूंनी दोन्ही खोल्या आवरुन टापटीप बनवल्या होत्या. आम्ही सामानाची लावालाव करे पर्यंतच काका आमची विचारपूस करायला आले. चहा-पाणी विचारले. त्यांच्या प्रसन्न चेहर्‍याने आणि विनम्र स्वभावाने जो काही थोडा प्रवासाचा शीण आला होता तो पळून गेला. थोडेसे फ्रेश झाल्यावर आम्ही तिथल्याच बाहेरच्या वर्‍हांड्यात गप्पा मारत बसलो. थोड्याच वेळात काकांनी जेवण तयार असल्याचे सांगितले. कोबीची ओलं खोबरं घालून केलेली सुकी भाजी, वांग-बटाट्याची रसभाजी, पापड, आमटी, गरम पोळ्या, भात असा बेत होता. काकूंच्या हाताला नक्कीच झकास चव होती. जेवताना सुद्धा काका स्वतः लक्ष देऊन आग्रहाने वाढत होते. अगदी तुडुंब जेवल्यावरही आम्ही खूपच कमी जेवलो असं त्यांचं मत होतं. गप्पांच्या ओघात काकांनी सांगितले होते की काकूंचे माहेर मालवण चे आहे त्यामुळे त्या उत्तम मासे बनवतात. मी एकटा सोडून बाकी कोणी मत्स्याहार करणारे नव्हते म्हणून मी तो बेत एकदा रद्द केला होता. पण काकूंच्या हातची चव चाखल्यावर मात्र मी रद्द केलेला बेत अमलात आणायचे ठरवले आणि रात्रीला माझ्यासाठी त्यांना मासे तर बाकींच्यांसाठी वालाचं बिरडं बनवायला सांगितले. जेवणानंतर "आडवं" व्हायची तीव्र इच्छा टाळून आम्ही काकांशी गप्पा मारत बसलो. त्यांच्या घरासमोरच एक जुना वाडा दिसत होता. तो कोणाचा काय असं विचारताच काका म्हणाले चला जाऊन बघून येऊ आपण वाडा. कोंकणातली माणसं खरच साधी आणि आगत्यशील असतात याचा प्रत्यय आला. ना ओळख ना पाळख पण तरी त्या वाड्याच्या मालकीण बाईंनी (श्रीमती अडुळकर) आमचे स्वगत केले. वाड्याच्या मागे त्यांची "वाडी" आहे. नारळ, पोफळी, केळी, फणस अशी अनेक झाडे आहेत. "वाडीत" मनसोक्त भटकून आम्ही पुन्हा मुक्कामी आलो. तो पर्यंत संध्याकाळचे ५ वाजत आले होते. मग आम्ही समुद्र किनार्‍यावर जायचे ठरवले.

अगदी ५ मिनिटातच आम्ही समुद्रावर पोचलो. शांत, अथांग समुद्र पाहून आमच्या बरोबरच्या लहानग्यांबरोबरच आमच्यातली "लहान मुलं" पण उसळून बाहेर आली आणि सर्वच जण पळत समुद्राच्या पाण्यात शिरलो. दिवेआगरचा समुद्र तसा धोकादायक नाहिये. आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांनी समुद्र किनारा पण खूपच स्वच्छ आहे. लाटांबरोबर खेळण्यात दोन तास कसे गेले हेच समजले नाही. सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती. समुद्र किनारी सूर्यास्ताची वेळ मला कायमच कातरवेळ भासते. एक अनामिक हुरहुर मनात दाटून येते. मी शांतपणे पाण्यातून बाहेर येऊन ती कातरवेळ कॅमेराबद्ध करण्याचा एक प्रयत्न केला. अंधार पडल्यावर दमून आम्ही मुक्कामी परत आलो.




सकाळी काकांनी स्वछ दिलेली खोली आम्ही आता वाळूमय करुन टाकली होती. स्वच्छ आंघोळ करून सर्वजण पुन्हा गप्पा मारत बसलो. थोड्याच वेळात काकांनी जेवणाची वर्दी दिली. परंतू त्यांनी वर्दी देण्याआधीच "मालवणी बांगड्याने" जेवण तयार होत असल्याची वर्दी आमच्या पर्यंत पोचवली होती. सकाळप्रमाणेच आग्रहाचे जेवून आम्ही तृप्त झालो. आम्ही जेवत असतानाच त्यांना एक फोन आला आणि २० एक माणसांची जेवणाची सोय होईल का अशी विचारणा झाली. खरंतर इतक्या ऐनवेळी कोणीही नकार दिला असता पण काकांनी थोडा उशीर चालत असेल तर करतो काहीतरी सोय असं सांगितले. "साडे आठांला आमचें दुकान बंद होतें" किंवा "साडे अकराला शेवटची ऑर्डर घेतली जाईल. त्यानंतर काही मिळणार नाही" अशी वाक्ये ऐकायला मिळणार्‍या शहरातून गेलेल्या आम्हाला हे नवलाईचेच होते.

दुसरे दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही आवरुन तयार झालो. काकूंच्या हातचा फर्मास चहा आणि कांदेपोहे असा भरपेट नाश्ता करून आम्ही त्यांचा निरोप घेतला. प्रथम ग्रामदैवताचे म्हणजेच सुवर्ण गणपतीचे दर्शन घेतले. गणपतीचा मुखवटा पूर्ण सोन्याने बनवलेला आहे. हा गणपती सापडल्यानंतर दिवेआगरला भेट देणार्‍या पर्यटकांचा ओघ वाढला.

तिथेच बाजूला थोडीशी कोंकण मेव्याची खरेदी करून आणि पुन्हा येथे येण्याचा निश्चय करूनच आम्ही या छोट्या पण टुमदार गावाचा निरोप घेतला.

पुण्याला परतण्यापूर्वी मुरुड-जंजिरा बघण्यासाठी आम्ही दिघी या गावी गेलो. इथून लाँचने जंजिरा पाहण्यासाठी जाता येते. समुद्रातून साधारण अर्ध्या तासाच्या प्रवासाने आपण किल्ल्यावर पोचतो. ज्या लाँचने आपण जातो ती अगदी किल्ल्याच्या जवळ जात नाही. त्यासाठी लाँचमधून छोट्या नावेत उतरावे लागते आणि ती नाव आपल्याला किल्ल्याच्या दरवाज्यापाशी सोडते. साधारण ३५०-४०० वर्ष पूर्वीचा हा किल्ला स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे. त्याकाळी एवढा हा भव्य किल्ला कसा बांधला असेल याचे नवल वाटत राहते. किल्ला बघण्यासाठी ४५ मिनिटांचा वेळ दिला जातो. कारण ज्या लाँचने आपण आलेलो असतो तीच लाँच आपल्याला पुन्हा दिघीला सोडते. सुमारे २२ एकरात पसरलेला किल्ला बघायला ४५ मिनिटे हा खूपच थोडा वेळ आहे. म्हणून जर गाईड केला तर साधारण १३-१४ पॉईंट्स ते आपल्याला दाखवतात. किल्ल्यावर जे काही अवशेष शिल्लक आहेत ते मराठ्यांच्या गतवैभवाची ओळख करुन देतात. हा एकमेव सागरी किल्ला आहे की जो अभेद्य आणि आजिंक्य राहिला. मनोमन शिवरायांना प्रणाम करत आम्ही पुन्हा दिघीला आलो.

दोन दिवस खूप समाधान आणि आनंद मिळवून पुन्हा पुण्यनगरीकडे प्रस्थान केले.

दिवेआगर मधील वास्तव्यासाठी :
श्री. नलावडे
शिवाजी चौक, दिवेआगर.
फोन नं. ०२१४७ ६९२२५५

Friday, June 06, 2008

पाऊस

मला सारखं आठवतं
आपलं पावसातलं भिजणं
तुझ्या गालावरून निथळणारं पाणी
मी बोटानी अलगद पुसणं
मग डोळे मोठे करुन
तुझं लटकेच रागावणं
नको नको म्हणत
माझ्या मिठीत हरवणं
सारं सारं आठवतं
विसरत काहीच नाही
एवढं मात्र ठावूक आहे
तो पाऊस पुन्हा पडणार नाही.....

Tuesday, February 26, 2008

प्राक्तन

मला वाटायचं

कुठल्याश्या एका क्षणी
'आपण' एकरुप झालो

अगदी की जसं
गाणे तुझे अन शब्द माझे
स्वप्न तुझे अन डोळे माझे

एकच श्वास अन एकच आस
मखमली वाट अन गुलाबी प्रवास

अन एका बेसावध क्षणी तू
आपला डाव खेळून गेलीस

अन मग सुरु झालं द्वंद्व
'आपण' एकरुप झालो? छे!
'तू' माझ्यात की 'मी' तुझ्यात?

शब्दबंबाळ प्रश्न अन
त्यांची शब्दबंबाळ उत्तरं
मनात फक्त प्रश्नांचीच आवर्तनं

मग शब्दांचेच बोचकारे
अन शब्दांचेच फटकारे
रक्तबंबाळ मात्र आपलीच मने

अन एका बेभान क्षणी
'मी' कुठेतरी फेकलो गेलो
अज्ञात, अथांग अनंतात....

तेंव्हापासून
सारं काही शांत आहे
शरीर माझं श्वास घेतंय
जगणं कधीच थांबलं आहे.........

Friday, February 15, 2008

एक क्षण

एक क्षण अवचित भेटला
चिंब पावसात भिजलेला
तिचा उष्ण श्वास अजूनही
माझ्या केसांत गुंतलेला

एक क्षण तोही आठवला
तिच्या सहवासात रमलेला
नियतीच्या एका आघाताने
अवेळीच भंगून गेलेला

एक क्षण पुन्हा आला
घेऊन नभ आठवांचा
पुन्हा खेळ सुरु झाला
उन्हा मागून पावसाचा...

पुनश्च हरि ओम!!

आज बर्‍याच दिवसांनी ब्लॉगला ऍक्सेस मिळाला. सर्वप्रथम त्याचे रुपडे पालटले. आता सवड मिळेल तसे काहीबाही खरडायचा प्रयत्न करीन.