Saturday, February 25, 2006

पुन्हा एकदा..

लाचार काया
तुटतो जीव
गात्रांचे पडघम
पुन्हा एकदा

भुकेला तान्हा
बाळमुठी चोखे
आटलां पान्हा
पुन्हा एकदा

देहात नशा
नजरेत विखार
स्पर्षलोलूप नर
पुन्हा एकदा

उमलतां रात्र
समर्पिते देह
त्याच वणव्यात
पुन्हा एकदा...

Wednesday, February 15, 2006

बोच

" अरे! पाट्या?? ओळखलंस का मला? " लक्ष्मीरस्त्यावरच्या गर्दीतून वाट शोधत मी माझ्याच तंद्रीत चाललो होतो. अन अनपेक्षितपणे कोणीतरी माझ्या खांद्यावर हात टाकून मला थांबवले. मी त्याच्याकडे थोड्या नाराजीनेच पाहिले. खरंतर मला टिळक स्मारकला " आयुष्यावर बोलू काही " चा प्रयोग गाठायचा होता. बाईकने ऐनवेळेस धोका दिल्यामुळे चालत चाललो होतो अन हा कोणी अनामिक इसम माझी वाट अडवून दत्त म्हणून उभा होता.

" काय ओळखलंस का? "
"...."
मी अजूनही संभ्रमावस्थेत होतो. एकतर मला उशीर होत होता आणि हा इसम मला इथे कोडी घालत होता.
" किती वर्षांनी भेटतोय लेका. तेसुद्धा पुण्यात, असे अचानक... "
त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद लपत नव्हता. त्याच्या बोलण्याच्या लकबीवरून तो सातार्‍याकडील असावा असा अदमास मी मनात बांधत होतो. पण तो कोण हे काही आठवत नव्हते. मी थोड्याशा रुक्षपणेच त्याला ओळखले नसल्याचे कबूल केले. माझी अजून परीक्षा न बघता त्याने स्वतःची ओळख करुन दिली.
" अरे मी मनोज नाईक.. शाळेत आठवी पर्यंत आपण बरोबर होतो... "
त्याने नांव सांगताक्षणी माझ्या डोक्यात प्रकाश पडला, अंगावर नकळत काटा आला. मला एकदम सोळा - सतरा वर्षांपूर्वीचा " मन्या " आठवला.

मनोज नाईक.. किडकिडीत शरीरयष्टी, कायमच वाढलेले थोडेसे कुरळे केस, रंग काळसर सावळा, वरचे दोन दात थोडे पुढे आलेले.

तसं आम्ही दोनच वर्षे एका वर्गात होतो. पाचव्या इयत्तेत मन्या आमच्या वर्गात आला. कोणी त्याची विशेष दखल घ्यावी असे कोणतेच गुण त्याच्यात नव्हते. सातवीत गेल्यानंतर शाळेत वारंवार गैरहजर राण्यावरुन त्याला आमच्या वर्गशिक्षकांनी एकदा सर्वांसमोर ताकीद दिली होती. त्याचा राग मनात धरुन तो भर वर्गातून निघून गेला होता. आमच्या वर्गशिक्षकांसह आम्हा सर्वांनाच तो मोठा धक्का होता. मुख्याधापकांनी त्याला ताकीद देऊन पुन्हा वर्गात बसायची परवानगी दिली होती. पण त्यानंतर दमदाटी, किरकोळ भांडणे, मारामार्‍या यावरुन मन्या सगळ्यांच्याच परिचयाचा झाला. शाळेतली वरच्या वर्गातली मुले सुद्धा त्याला वचकून असत. आम्हाला तर वर्गात बर्‍याचदा त्याची दादागिरी सहन करायला लागायची. पुढे आठवीत गेल्यावर गुणक्रमानुसार त्याची तुकडी बदलली आणि आम्हाला थोडं हायसं वाटलं होतं. पण आठवीची शाळा सुरु झाल्यावर थोड्याच दिवसांत शहर पोलीसांनी त्याला एका गुन्ह्यात संशयीत आरोपी म्हणून पकडलं आणि त्याची शाळेतून कायमची हाकालपट्टी झाली. त्याच्या घराच्या आसपास राहणार्‍या काही मुलांकडून त्याला नंतर रिमांड होम मध्ये ठेवल्याचे समजले. त्यानंतर मन्याचा आणि आमचा कधी संबंधच आला नाही. कालांतराने तो आमच्या विस्मृतीतसुद्धा गेला. मन्या बालगुन्हेगार कसा बनला? त्याच्या घरची background काय होती हे प्रश्न आम्हाला कधी पडलेच नाहीत. आणि आज तोच मन्या माझ्यासमोर उभा होता.

" आता तरी ओळख लागली का? "
" हो. "
मी थोड्याशा तुटकपणे म्हणालो.
" अरे वा! नशीब आमचं. तुम्ही पुढे बसणारी मुलं. त्यात तू तर तबला वाजवण्यामुळे शाळेत famous . काही बदल नाही झाला रे तुझ्या चेहर्‍यात. लगेच ओळखलं बघ मी तुला एवढ्या गर्दीतसुद्धा "
तो उत्साहाने बोलत होता आणि मी कसंनुसं हासल्यासारखं करत होतो.
" मग अजून तबल बिबला वाजवतोस ना? काय करतोस सध्या? तसं तुझ्याकडे पाहून तरी मोठा साहेब असशील असं वाटतंय. लग्नबिग्न झालंय की नाही? "
त्याची प्रश्नांची सरबत्ती सुरूच होती. माझ्या कपाळावर आता सूक्ष्म आठ्या उमटायला सुरुवात झाली होती. पण तरी त्याच्या एखाद्यातरी प्रश्नाचे उत्तर देणे मला भाग होते म्हणून शक्य तेवढा कोरडा स्वर ठेवत मी त्याला उत्तरे देत होतो.
" अरे तबला ना चालु आहे आपलं जमेल तसं. बाकी व्यापात तसा वेळच मिळत नाही म्हणा... "
" अरे मी भोसरीला एका छोट्या कंपनीत फिटर म्हणून कामाला आहे. निगडीला दोन खोल्या घेतल्यात भाड्याने. मी बायको आणि छोटी मुलगी राहतो तिथे. सहा महिन्यांपुर्वी आई वारल्यापासून अण्णाही माझ्याकडेच असतात. "
खरंतर त्याच्या कुटुंबीयांबद्दल मला कधीच माहिती नव्हती. पण उत्साहाच्याभरात हे त्याच्या लक्षातही आले नव्हते. तो बोलतच होता.
" आठवीत शाळा सुटली. रिमांडहोममध्ये गेलो. तिथेही शिकण्यात रस नव्हताच. तिथेही उनाडक्याच जास्त करायचो. पण नशिब चांगले म्हणून काजरेकर सर भेटले आणि मी करत असलेली चूक समजली. ठरवलं की आपणपण चांगला माणूस व्हायचं. अरे आपल्या शाळेतही खूप चांगले शिक्षक होते जे मला तेंव्हा समजवायचे पण कसली मस्ती चढली होती मला कुणास ठावूक. पण काजरेकर सरांनी आयुष्याला दिशा दिली. त्यांच्याच सांगण्यावरून मग फिटरचा कोर्स केला. "

तो सांगत असलेल्या कुठल्याही गोष्टीचा मला संदर्भ लागत नव्हता. ना मला त्यात रस होता. मला आता त्याचा राग यायला लागला होता. त्याने पुन्हा संभाषणाची गाडी पुढे रेटली.
" अरे तू काय करतोस हे सांगितलेच नाहीस. कुठे राहतोस? आणि लग्नाची गोष्टही अगदी सोईस्कर टाळलीस की रे सांगायची.. ए तुला वेळ असेल तर चल ना कुठेतरी कटिंग मारूयात. "
त्याच्या अश्या सलगीच्या बोलण्याचा मला खूप राग आला होता. त्या तिरीमिरीतच मला त्याच्यातले आणि माझ्यातले अंतर त्याला दाखवून द्यायची असुरी इच्छा झाली. मी जरा तोर्‍यातच सांगितले
" मी एका software कंपनीत आहे कामाला. आणि कोथरूडला माझा स्वतःचा ५ रुम्सचा फ्लॅट आहे. " तेवढ्यात माझा सेलफोन वाजला. त्याला दाबायची अजून एक संधी साधत मी मोठ्या दिमाखात माझा महागडा सेलफोन काढून त्याच्या समोर नाचवत बोललो. आणि तीच सबब मला आत्ता वेळ नाही पुन्हा जाऊ कधीतरी चहा प्यायला म्हणून ठोकून दिली.

या सर्वाच्या त्याच्या चेहर्‍यावर थोडा परीणाम झालेला दिसला. थोडसं ओशाळवाणं हासून त्याने त्याचा मोबाईल खिशातून काढला.
" अरे तुझा नंबर सांग ना. स्टोअर करुन ठेवतो. भेटू पुन्हा कधीतरी निवांत. "
मी त्याला नंबर दिला, वर खिशातून माझे visiting card पण दिले. त्याने त्याचा नंबर घेण्याचा आग्रह केला. मी त्याला मला missed call द्यायला सांगितले व बोललो की नंतर save करतो. त्याने लगेचच माझ्या नंबरवर रिंग केली. मी त्याकडे दुर्लक्ष करत विजयी मुद्रेने तिथून काढता पाय घेतला. थोडे पुढे गेल्यावर त्याचा नंबरही delete करुन टाकला.

कार्यक्रमाला पोचायला थोडा उशीरच झाला होता. त्यामुळे शिव्या घालायच्या निमित्ताने ' मन्याच' माझ्या मनात होता. एकाहून एक सरस गाणी सादर होत होती पण अचानक भेटलेला ' मन्या' माझ्या मनात ठाण मांडुन बसला होता.

कार्यक्रमानंतर तंद्रीतच घरी आलो पण मन्या काही पाठ सोडत नव्हता. अंथरुणावर पडूनही मी तोच विचार करत होतो. आणि अचानक मी भानावर आलो. का वागलो मी असा? तो तर माझ्याशी वाईट वागला नाही. भूतकाळातला मन्या आणि आजचा मन्या यात जमिन अस्मानाचा फरक होता. तस आठवलं तर शाळेत असतानासुद्धा त्याने माझे वैयक्तिक काहीच नुकसान केले नव्हते. आणि आता तर ती शक्यताही नव्हती.

आज अचानक भेटल्यावरही भले मी त्याला ओळखले नाही पण त्याने मला ओळखले म्हणजे त्याने त्या आठवणींचे धागे अजून मजबूत पकडून ठेवले आहेत. माझ्याशी बोलून त्याला त्याच्या आठवणी ताज्या करायच्या असतील. मी तबला वाजवायचो याचा त्याला किती आदर होता. मी सध्या काय करतो हे त्याने केवळ उपचारापुरतेच विचारले. त्याला त्याच्याशी काहीच देणे घेणे नव्हते. त्याला केवळ त्याचा एक जुना वर्गमित्र हवा होता. चार शब्द बोलायला. अन मी कसा वागलो त्याच्याशी?

कमी शिक्षण असूनही स्वतःच्या पायावर उभा असलेला, संसारात रमलेला, वडिलांना सांभाळण्याची जाण ठेवणारा, रस्त्यात अचानक भेटूनही मला चहा पिऊयात असा शिष्टाचार दाखवणारा मन्या मला माझ्यापेक्षा जास्त सुसंस्कृत वाटला. माझ्या बेगडी सुसंस्कृतपणाची मलाच लाज वाटली. का मी त्याचा नंबर तत्परतेने delete केला? कदाचीत मी त्याला कधीच कॉल नसता केला. पण असे कितीतरी नंबर माझ्या सेलमध्ये जागा अडवून बसले असतील. मग या एका नंबरने असा किती फरक पडला असता?

आज माझा नंबर त्याच्याकडे आहे. त्याचा माझ्याकडे नाही. माझ्याशी संबंध ठेवायचे की नाही हे आता तो ठरवणार.. त्याला मी पराभूत करायला गेलो पण खरा पराभूत मीच आहे.. तो जिंकल्याचे किंवा मी हरल्याचे दुःख नाही, पण काहितरी हरवल्याची बोच मात्र कायम राहील....

Tuesday, February 07, 2006

जाता जाता सहजच

आपणही आरंभशूर ठरतोय की काय असं वाटायला लागलं होतं.. ब्लॉगची सुरुवात तर उत्साहात केली होती पण नंतर मात्र गाडी अडकली.. पण काल सचिनने ज्या मनोनिग्रहाने ( बापरे! केवढा जड शब्द!! ) शतक मारले त्या मनोनिग्रहाने मला विचार करण्यास भाग पाडले..

मी नियमीतपणे ब्लॉग नाही लिहू शकत कारण ऑफिसात कामाचा ताण, घरी छकुलीची गडबड.. असो कारणं एक ना अनेक.. विचाराअंती एवढेच जाणवते की ब्लॉगवर लिहिणे ही माझी priority नाहिये हेच खरं कारण आहे.. ऑफिस, छकुली ही सारी निमित्तं आहेत..

एखादी गोष्ट न करण्याला अगणित कारणं असू शकतात पण ती गोष्ट करायला ती गोष्ट करायचीच आहे एवढे एक कारण पुरेसे असते.. तर असो याच मनोनिग्रहाने मी ब्लॉग अपडेट ठेवायचे ठरवले आहे.

काल सचिनने एक दिवसीय सामन्यातील एकोणचाळिसावे शतक पूर्ण केलं. गेल्या आठवड्यात कराची कसोटी सामन्यानंतर " नेमेची येतो पावसाळा " प्रमाणे सर्व प्रसार माध्यमांनी एकच हाकाटी सुरु केली " सचिन संपला " . मला खात्री होती की दरवेळेप्रमाणेच सचिन तोंडाने न बोलता त्याच्या खेळीनेच उत्तर देणार आणि काल त्याचे शतक झाले. दुसरा एक मैलाचा दगड त्याने काल पार केला तो म्हणजे एकदिवसीय सामन्यात चौदा हजार धावांचा टप्पा त्याने ओलांडला.

सचिन एखादी इनिंग खेळला नाही की प्रसारमाध्यमे त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु करतात. सचिन संपला अशी आवई उठवतात. opinion polls चे पीक येते. परवा तर एका वाहिनीने त्यांची खेळणार्‍या अकरा खेळाडूंची यादी तयार केली त्यात सचिनला स्थान नव्हते. ही सचिनची अवहेलना नसून त्या वाहिनीने स्वतःचे करुन घेतलेले हसू होते. असो त्यांना त्यांची भाकरी भाजून घेण्यासाठी असे तवे पेटवावेच लागतात.

सचिन हा महान खेळाडू आहे हे नव्याने सांगण्याची गरजच नाहिये. वाढत्या वयोमानानुसार आणि दुखापतीमुळे तो एक ना एक दिवस निवृत्त होणार हे सुद्धा नक्की. सचिन परत पुर्वीच्या भरात येणार नाही हे सत्य आहे. पण तो एवढा परिपक्व आहे की हे निर्णय तो स्वतः घेईल, योग्य वेळेस घेईल. कुठल्याही विक्रमाची वाट बघत त्याला संघात खेळवण्याची आवश्यकताच भासणार नाही. तो स्वतः कधीच विक्रमासाठी खेळला नाही. तो खेळत गेला आणि विक्रम त्याच्या पायाशी लोळण घेत गेले.

सचिनने त्याच्या झंझावाताची इतकी सवय लावली होती की त्याचे आता झुळुकी सारखे येऊन प्रसन्न करुन जाणे लोकांच्या पचनी पडत नाहिये. कोणत्याही गोष्टीचे व्यसन वाईटच. सचिनने आम्हाला त्याने केलेले विक्रम बघायचे व्यसन लावले.भारतीय संघ खेळत असताना, अकराजण शरीराने सामना खेळत असतात तर कोट्यवधी लोक तेंव्हा मानसिक सामना खेळत असतात. मोठी स्वप्न रचत असतात. सचिनसारख्यांनीच जनतेला मोठी स्वप्न पाहायची सवय लावली हाच कदाचीत त्यांचा दोष असू शकतो.

सचिनच्या तंत्रावर बोलण्याची माझी पात्रता नाही परंतू सध्या निरीक्षणातून एक गोष्ट लक्षात आली ती अशी की सध्या तो half-cock खेळतोय. जे त्याला त्रासदायक ठरतंय. bat-pad मध्ये gap राहून तो सध्या वारंवार त्रिफळा बाद होतो. कालही नावेदच्या एका चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला परंतू सर्वांच्याच सुदैवाने तो नोबॉल होता. आणि अशी ही सुदैवाची कुबडी सचिननं घेणं हीच गोष्ट पचनी पडत नाही. टेनिस एल्बो ची दुखापत असेल किंवा अजून काहिहि कारण असेल त्याचे या तंत्राने खेळण्यामागे पण ते सदोष आहे असं मला वाटते. असो.

सचिन हा उर्जेसारखा आहे. जो संपणार नाही.. कदाचीत उर्जेसारखाच एका अवस्थेतून दुसर्‍या अवस्थेत त्याचे रुपांतर होईल......